बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि युपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत दोजो यात्रे’बाबत प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर पोस्ट केली की, पोट भरलेले लोक डोजा आणि इतर खेळांचे महत्त्व नाकारत नाहीत. पण, गरिबी, बेरोजगारी, महागाई, मागासलेपणा इत्यादींनी ग्रासलेल्या कुटुंबांचे काय, ज्यांना उदरनिर्वाहासाठी कष्ट करावे लागतात? अशा स्थितीत ‘भारत दोजो यात्रा’ ही त्या कुटुंबीयांसाठी उपहासाहून कमी नाही.असे म्हणत मायावतींनी राहुल गांधींना चांगलेच सुनावले आहे.
मायावती म्हणाल्या की, आरक्षणाच्या नावाखाली आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या भारतीय आघाडीने एससी, एसटी आणि ओबीसींची मते घेऊन आपली ताकद वाढवली आहे. त्यांची भूक आणि तळमळ विसरून त्यांच्याबद्दल ही उपहासकारक वृत्ती अंगीकारणे योग्य आहे का? खेळाचे राजकारण करणे आता योग्य नाही.
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रे दरम्यानचा एक व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यात राहुल गांधी जिउ-जित्सू मार्शल आर्टचा सराव करताना दिसत आहेत. याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये ‘भारत दोजो यात्रा सुरु होत आहे ’ असे लिहिले आहे.
त्यांनी पुढे लिहिले आहे की , या तरुणांना ‘जेंटल आर्ट’ची ओळख करून देणे हे आमचे ध्येय आहे. आमचा उद्देश त्यांच्या हिंसेचे सौम्यतेत रूपांतर करणे, त्यांना अधिक दयाळू आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी साधने देणे हे होते. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त, मला माझा अनुभव तुम्हा सर्वांसोबत शेअर करायचा आहे, तुमच्यापैकी काहींना ‘जेंटल आर्ट’चा सराव करण्याची प्रेरणा मिळेल या आशेने आम्ही हा व्हिडिओ शेअर केला आहे.
यावर टीका करत मायावतींनी भारतातल्या जनतेला खेळ वगैरे शिकवण्यापेक्षा त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करा असे राहुल गांधींना सुचवले आहे.