Narendra Modi : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मुंबई पालघरमध्ये त्यांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाधवन बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होत आहे. स्थानिकांनी यावेळी ‘MODI GO BACK…चे पोस्टर दर्शवत या प्रकल्पाला विरोध केला आहे. यावेळी स्थानिकांनी एकच मागणी केली ती म्हणजे वाढवण बंदर रद्द!’
पंतप्रधान मुंबईत दाखल होण्यापूर्वीच येथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला. जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार उभारणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाधवन बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल जल बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. हे बंदर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी देखील सुसज्ज असेल.
स्थानिकांचा विरोध का?
वाढवण परिसरातील समुद्र मत्सबीज उत्पादनासाठी उत्तम असल्याने याला सुवर्णपट्टा म्हणून संबोधले जाते. मात्र या भागात बंदर उभारल्यास जलसंपत्तीचा विनाश होण्याची भीती स्थानिकांच्या मनात असल्याने त्यांनी गेल्या 28 वर्षांपासून या बंदराला विरोध कायम ठेवला आहे. तसेच बंदरामुळे समुद्रातील पाणी पातळीत वाढ होईल आणि पावसाळ्यात किनाऱ्यावरील गावांमध्ये पाणी घुसेल, अशीही भिती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.