सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका देखील सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या घटनेवर माफी मागितली आहे. मात्र यावरूनच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत म्हणाले आहेत की, आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावे लागेल. आणि तसेच आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच काल पंतप्रधानांनी माफी मागितली अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. ही फक्त राजकीय माफी होती असा घणाघात देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.
या घटनेवर माफी मागत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही यामुळेच ही फक्त राजकीय माफी आहे.
राज्यातील लोकांनी पंतप्रधानांना माफी मागून हा विषय सुटेल असा सल्ला दिला असेल परंतु माफी मागून हा विषय सुटणार नाही. माफी हा फक्त राजकीय विषय आहे त्यामुळे महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेले नाही हे लवकरच कळेल असे भाष्य देखील संजय राऊत यांनी केले आहे .
या दुर्घटनेसाठी जे जबाबदार आहेत त्यांचा तपास कोण करणार, आरोपींना अटक कोण करणार ? शिल्पकाराला हे काम कोणी दिले ? त्यांची नाव कधी समोर येणार ? असे प्रश्न देखील त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केले आहेत.