राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असलेल्या आणि कोल्हापूर पोलिसांनी अटक करून मालवण पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या रचना सल्लागार चेतन पाटील (वय ४५, राहणार शिवाजी पेठ कोल्हापूर) याला आज दुपारी मालवण न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश एम. आर. देवकाते यांनी संशयित आरोपी पाटील याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि रचना सल्लागार चेतन पाटील यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर चेतन पाटील यांच्या अटकेसाठी मालवण पोलीस गेल्या चार दिवसापासून कोल्हापुरात ठाण मांडून होते. कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठ, राजारामपुरी, गगनबावडा वडणगेसह सांगली जिल्ह्यात सहा ठिकाणी छापेमारी करून डॉ पाटील याचा शोध घेण्यात आला. गुरुवारी सायंकाळपर्यंत त्याचा मागमूस लागला नव्हता.
दरम्यान, संयुक्त पोलीस पथकाने चेतन पाटील यांची पत्नी वृद्ध आईसह त्याच्या काही मित्रांकडे संपर्क साधून चौकशी केली होती. मात्र, सोमवारपासूनच तो पसार झाला होता. 2010 पासून प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत सुद्धा त्यांने विनापरवानगी दांडी मारली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
चेतन पाटील याला ताब्यात घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांचे पथक सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात ठाण मांडून होते. त्यांच्या मदतीला स्थानिक गुन्हा अन्वेषण यांच्यासह चार पथक तैनात करण्यात आली होती. चार दिवस कोल्हापूर पोलिसांची चार आणि मालवण पोलिसांची दोन पथके चेतन पाटील यांच्या मागावर होती. सोमवारपासून पोलिसांचे पथक चेतन पाटील यांच्या मागावर होते. गुन्हा दाखल झाल्यापासून चेतन पाटील याने एका मित्राकडून रक्कम उसने घेऊन पलायन केले होते. त्यानंतर सातारा, सोलापूर, बेळगाव, चिकोडी मार्गे बेंगलोरला जाण्याच्या तयारीत तो होता. त्याचवेळी गुरुवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. डॉक्टर चेतन पाटील याला आज दुपारी मालवण येथील न्यायालयात हजर केले असता त्याला पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.