सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून सरकारवर जोरदार टीका देखील सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मूक आंदोलन करण्यात आले. यानंतर अजित पवार गट तिसरी आघाडी करणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावर भाष्य केले होते. यामुळे आता आनंद परांजपे यांनी रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांना त्यांच्या पक्षात जयंत पाटील हे फारस महत्व देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे फावला वेळ खूप आहे. मला माहित नाही त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला आहे का? अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे.
आम्ही महायुती सोबतच निवडणूक लढवणार आहोत असे देखील आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले आहे. षण्मुखानंद सभागृहात मेळावा पार पडला यावेळी अजित पवारांकडून सांगण्यात आले होते की, आम्ही महायुती सोबतच लढणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर माफी मागितली परंतु विरोधकांकडून ही राजकीय माफी असल्याच्या टीका केल्या गेल्या. यावर बोलताना आनंद परांजपे यांनी राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात. राहुल गांधींना माफी मागायला लावणार का? असा संतप्त सवाल विचारला आहे.