आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी कंबर कसली असून, अनेक बड्या नेत्यांमध्ये बैठका पार पडत आहेत. अशातच काल मध्यरात्री महायुतीमधील मोठ्या नेत्यांची नागपुरात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विदर्भासह संपूर्ण राज्याच्या जागा वाटपा संदर्भात सखोल चर्चा झाली.
कालच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. सध्या महायुतीत नेते एकमेकावर टिका करत आहेत. शिवाय जागांवरूनही रस्सीखेच सुरू आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता नागपुरातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे हे नेतेही उपस्थित होते.
शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात आधी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर थोड्या वेळाने एकेक करुन महायुतीचे सर्व नेते रामगिरी बंगल्यावर पोहोचले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने विदर्भात महायुतीची रणनीती कशी असावी? जागा वाटपांचा प्राथमिक सूत्र काय असावं? या संदर्भात ही बैठक पार पाडली.
गेल्या काही दिवसात महायुतीमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. महायुतीतील नेते एकमेकांवर टिका करत आहेत. यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो. याच पार्श्ववभूमीवर ही बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत पुढच्या काळात आपसातील वाद चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घेण्याचे ठरले आहे. त्याबाबत आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले जावे असेही निश्चित झाले आहे.