High Court : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात याचिका दाखल करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नांदेडचे रहिवासी मोहन चव्हाण यांना या प्रकरणी दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नेमकं काय आहे हे पूर्ण प्रकरण? पाहूया…
याचिकाकर्ते चव्हाण हे बंजारा समाजातील असून दर्शनशास्त्रामध्ये डॉक्टरेट असल्याचा दावा ते करतात. त्यांनी याचिकेमध्ये म्हटले होते की, एका कार्यक्रमात पुजाऱ्यांनी दिलेले पवित्र भस्म लावण्यास ठाकरेंनी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या, या प्रकरणी चव्हाण यांनी याचिका दाखल केली होती. ज्यावर आता सुनावणी पार पडली.
न्यायमूर्ती एस.जी. मेहरे यांच्या एकल खंडपीठाने २९ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, कायद्याचे थोडेसे ज्ञान असलेली व्यक्ती देखील प्रथमदर्शनी असे म्हणेल की, हे कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर करणे किंवा प्रसिद्ध होण्यासाठी न्यायिक व्यवस्थेचा वापर करणे आहे.
अशा याचिकांमुळे समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची प्रतिमा मलिन होते. अनेकवेळा अशा याचिका वाईट हेतूने दाखल केल्या जातात. उद्धव ठाकरे यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांना कोणताही आधार नाही.
या सुनावणीत न्यायालयाने म्हंटले आहे की, कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केल्याबद्दल चव्हाण याना दंड ठोठावण्यात येत आहे. त्यांनी तीन आठवड्यात उद्धव ठाकरेंना दोन लाख रुपये दंड रक्कम दंडाची द्यावी. ही रक्कम न भरल्यास कडक कारवाई येईल असे देखील न्यायालायने म्हंटले आहे.
उच्च न्यायालयाने आदेश दिला की, “याचिकाकर्त्याने (चव्हाण) माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा डीडी (डिमांड ड्राफ्ट) खरेदी करावा, त्यांच्या घरी जाऊन तो त्यांच्या हातात किंवा त्यांनी निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीला द्यावा.”