Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांचे एक वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अहमदनगर येथे काल महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल एक वादग्रस्त विधान केले, ज्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला खुली धमकी देत म्हंटले होते, “जर आमच्या रामगिरी महाराजांच्या विरूद्ध काही कुणी बोललं तर मशिदी मध्ये येऊन एकेकाला मारेन’.
मागील काही दिवसांपूर्वी महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैगंबरांवर टिप्प्णी केल्यानंतर त्यांच्या विरूद्ध अनेक ठिकाणी मोर्चे निघाले होते. मात्र, अहमदनगर मध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला या मोर्चात नितेश राणे उतरले आणि त्यांनी मोर्च्याचे नेतृत्त्व केले.
दरम्यान, AIMIM नेता वारिस पठाण यांनी नितेश राणे यांचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच भाजपाचा निवडणूकीपूर्वी हिंसा करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हंटले आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केली.
त्यांच्या या वादग्रस्त विधानानंतर तोफखाना पोलिस ठाण्यात कलम ३०२, १५३ आणि भारतीय न्याय संहितेच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणेंवर भडकावू भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. तोफखाना पोलीस आज नितीश राणे यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावणार आहेत.