आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्ष जोरदार करत आहेत. अनेक राजकीय चर्चांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात एकमेकांवर जोरदार टीका देखील सुरू आहे असं असतानाच अनेक नेते पक्षांतर करणार अशा चर्चा रंगत होत्या. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे देखील भाजप घरवापसी करणार अशा चर्चांना उधाण आले होते परंतु एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार असल्याचा चर्चा होत आहेत.
मी भाजप पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे. तसेच आमदार आहे. मी माझा राजीनामा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिलेला आहे. परंतु त्यांनी माझा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच मला शरद पवार साहेबांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत मनाई केलेली आहे, असे एकनाथ खडसे यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आहे.
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या जळगाव मधील बोदवड उत्पन्न बाजार समिती शुभेच्छा बॅनरची चर्चा सगळीकडे सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर शरद पवार, मुलगी रोहिणी खडसे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे फोटो लावलेले आहेत . यामुळे एकनाथ खडसे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच राहणार का अशी शंका वर्तवली जात आहे .
एकनाथ खडसे यांच्या भाजप पक्षप्रवेशाला वेळ का लागत आहे? एकनाथ खडसे नक्की कोणत्या पक्षात आहेत ? असे प्रश्न रक्षा खडसे यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रश्नांना उत्तर देताना रक्षा खडसे म्हणाल्या आहेत की, नाथाभाऊंनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय असून तो त्यांनाच विचारणे हे अधिक चांगले आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांच्या पक्षप्रवासाला वेळ लागला असून आता एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकले आहेत .यामुळेच एकनाथ खडसे नक्की काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.