आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्ष जोरदार करत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना राजकीय वर्तुळात एकमेकांवर टीकाटिप्पणी देखील सुरू आहे. असे असतानाच आता छगन भुजबळ आणि माजी जि प सदस्य अमृता पवार यांच्यात एकमेकांवर हल्लाबोल सुरू आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे नांदूरमध्यमेश्वर ग्रामपंचायत मार्फत अंगणवाडी आणि आरोग्य केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रित केले नाही यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्रशासन आणि माजी जि प सदस्य अमृता पवार, सुरेखा नरेंद्र दराडे यांची तक्रार केली आहे. यानंतर आता अमृता पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना, एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याने एवढे छोटे मन दाखवले याचे दुःख वाटते. असे वक्तव्य त्यांनी केले आहे. येवला विधानसभा मतदारसंघातून भाजप नेत्या अमृता पवार निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यासाठी दराडे कुटुंबाकडून प्रयत्न चालू आहेत.
परंतु छगन भुजबळ यांना उद्घाटनाला न बोलवण्याचा कोणताच हेतू नव्हता असे स्पष्टीकरण देखील अमृता पवार यांनी दिले आहे. या घटनेमुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे. अमृता पवार शरद पवार गटात प्रवेश करणार का ? अशा चर्चा रंगत आहेत. भाजप नेत्या अमृता पवार यांनी शरद पवारांचे, छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात आल्यावर स्वागत केले होते.
यामुळेच आता अमृता पवार शरद पवार गटात प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यावर मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना आगामी निवडणुकीत रंगणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.