Ajit Pawar : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळला. ही घटना सोमवारी 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
याच पार्श्ववभूमीवर काल रविवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, ‘जर हिंमत असेल तर समोर या. मीही बघतो.’ अशा भाषेत विरोधकांना सज्जड दम भरला आहे. ते बारामतीत बोलत होते.
बारामतीत आज राष्ट्रवादी काँग्रेसची जन सन्मान यात्रा पार पडत आहे. यावेळी अजित पवारांनी भाषण केले. या भाषणावेळी अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल चढवला, आणि महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर टीका केली.
महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “या घटनेचे विनाकारण राजकारण करु नका. आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले, आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. जर हिंमत असेल तर समोर या. मीही बघतो. हा कसला रडीचा डाव खेळताय”, अशा शब्दात विरोधकांना झापले आहे.
कालचे आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात पार पडले.