Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांचाही महाराष्ट्रभर दौरा असणारा आहे. अशातच केंद्राकडून शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली. मात्र शरद पवार यांनी झेड प्लस दर्जाची सुरक्षा नाकारली.
केंद्राकडून सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवार यांनी शंका व्यक्त केली. यावर ते म्हणाले होते, मला कशासाठी सुरक्षा पुरविली हे माहीत नाही. कदाचित निवडणुका आल्या आहेत. म्हणून त्यांना माझ्यावर पाळत ठेवायची आहे, योग्य आणि अचूक माहिती मिळवायची आहे, म्हणून त्यांनी सुरक्षा दिली असेल अशी शंका त्यांनी व्यक्त केली आणि केंद्राने दिलेली सुरक्षा घेण्यास नकार दिला.
यावरच आता भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते, यावेळी ते म्हणाले, “त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली असेल म्हणून केंद्राकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली, त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी नाहीं. आमचं सरकार एवढं जागरूक आहे की माहित मिळताच झेड प्लस हजर.”
यावेळी नारायण राणे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले, तसेच विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच महाविकास आघाडीच्या कालच्या जोडे मारो आंदोलनावर देखील त्यांनी यावेळी निशाणा साधला.
शरद पवार यांना 21 ऑगस्ट रोजी केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले होते, मात्र शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्यास नकार दिला. या संदर्भात दिल्लीत शरद पवारांच्या उपस्थित बैठक देखील झाली. मात्र, यावर कोणताही तोडगा निघाला नाही.