Mumbai News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यांतच कोसळला. ही घटना सोमवारी 26 ऑगस्ट रोजी घडली. या घटनेवरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. तसेच राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे.
याच पार्श्ववभूमीवर काल रविवारी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावरूनच आता भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत आज नारायण राणेंची पत्रकार परिषद पार पडली, यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
कालच्या महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर भाष्य करताना नारायण राणे म्हणाले, “शरद पवार यांनी या वयात छत्रपतींच्या कल्याणकारी महाराष्ट्र निर्माणासाठी काम करायला पाहिजे. शांततेसाठी मोर्चा काढला पाहिजे. परंतु त्यांची प्रत्येक कृती संशयास्पद असते. पेट्रोल टाकून ठेवायचं आणि काडी घेऊन फिरायचं, अशा कृतीला महाराष्ट्रात स्थान नाही. शातंतेऐवजी ते लावालावी करतात”, असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला.
यावेळी नारायण राणेंनी शरद पवार यांना सल्ला देत, “जातीचे राजकारण नको. पुतळा पडला, एकत्र येऊ या. चांगला पुतळा उभारू या. देखणा पुतळा उभारू. बोलला असता, तर किर्ती वाढली असती, म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, “शरद पवारांची प्रत्येक कृती संशयास्पद आहे. मराठ्यांच्या राजकारणात, पण ते राजकारण खेळत आहे. वय वर्षे 83 पर्यंत स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाहीत. असे देखील त्यांनी यावेळी म्हंटले आहे.