सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरू आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीत विजय मिळावा म्हणून जोरदार तयारी करत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करणार अशा चर्चा होत आहेत. पक्षांच्या जागावाटपावरून बैठक देखील पार पडत आहेत. महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दलची महत्वाची बैठक ४ सप्टेंबरला पार पडणार असून या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबतची महत्वाची माहिती दिली आहे.महाविकास आघाडीच्या जगावाटपाचा निर्णय गणेश उत्सवानंतर होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये तीन पक्षांचा समावेश आहे.यामुळेच त्यांचे जागा वाटप कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक दलाची केरळमध्ये बैठक पार पडली असून या बैठकीनंतर जातीय जनगणनेमुळे समाजाच्या एकता आणि अखंडतेला धोका आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक दलाने म्हटले आहे.
यावरच आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शोषित पीडित समाजाला योग्य न्याय मिळावा, यासाठी काँग्रेसला जातनिहाय जनगणना हवी आहे असे भाष्य नाना पटोले यांनी केले. काँग्रेसला जातनिहाय जनगणना राजकीय फायद्यासाठी हवी आहे असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत असेल तर मात्र तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गैरसमज आहे असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नाना पटोले, विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चेला सुरुवात कधी करायची याबाबत बोलणार आहेत अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरुन अजून चर्चा सुरू असतानाच महायुतीच्या जागावाटपाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांच्या एका विधानाबाबत चर्चा होताना दिसत आहे.
दरम्यान, पत्रकारांशी गप्पा मारताना जागावाटप निश्चित झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली होती. परंतु अद्याप जागावाटप झाले नाही अशी माहिती महायुतीच्या इतर नेत्यांनी दिली आहे.