Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्रुनेईच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ब्रुनेई दौरा आहे. ब्रुनेईचे 29 वे सुलतान हसनल बोलकिया यांनी स्वतः पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे. भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या दृष्टिकोनातून ब्रुनेई हा एक अतिशय महत्त्वाचा देश आहे. अशा स्थितीत मोदींचा ब्रुनेई दौरा खूप खास मानला जात आहे.
कुठे आहे ब्रुनेई?
ब्रुनेईचे पूर्ण नाव ब्रुनेई दारुसलाम आहे. बोर्नियो बेटावर वसलेला हा दक्षिण पूर्व आशियातील एक छोटासा देश आहे. ब्रुनेई एकूण 5765 चौरस किलोमीटरमध्ये पसरला आहे. हा इतका लहान आहे की सिक्कीमसारखी अनेक राज्येही त्याहून मोठी आहेत. ब्रुनेईची राजधानी बंदर सेरी बेगवान आहे. 2023 च्या आकडेवारीनुसार, ब्रुनेईची एकूण लोकसंख्या 455,885 होती. त्यापैकी राजधानी बंदर सेरी बेगवानमध्ये सुमारे दोन लाख लोक राहतात.
ब्रुनेईचा सुलतान किती श्रीमंत?
ब्रुनेईमध्ये 14 व्या शतकापासून राजेशाही आहे. सध्या हाजी हसनल बोलकिया हे ब्रुनेईचे सुलतान आहेत. ते 1967 पासून सुलतानच्या गादीवर आहे. 1984 मध्ये इंग्रज इथून निघून गेल्यावर बोलकिया पंतप्रधानही झाले. जरी ब्रुनेईची गणना जगातील सर्वात लहान देशांमध्ये होत असली तरी सुलतान बोलकिया यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये केली जाते. 1980 पर्यंत ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. एका प्रसिद्ध वृत्तानुसार, बोलकिया यांच्याकडे 1.4 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. सुलतानचे बहुतांश उत्पन्न हे तेल आणि नैसर्गिक वायूच्या साठ्यातून मिळणाऱ्या कमाईतून येते.
जगातील सर्वात मोठा महाल
ब्रुनेईचा सुलतान हसनल बोलकिया जगातील सर्वात मोठ्या राजवाड्यात राहतो. त्याचा राजवाडा ‘इस्ताना नुरुल इमान’ जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान राजवाड्यांमध्ये गणला जातो. 20 लाख स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला हा महाल 1984 मध्ये बांधण्यात आला होता आणि त्यावेळी त्याची किंमत अंदाजे 50 रुपये होती. या महालचा घुमट 22 कॅरेट सोन्याचा आहे. यात 1700 खोल्या, अडीचशेहून अधिक स्नानगृहे आणि पाच स्विमिंग पूल आहेत. या राजवाड्यात एकाच वेळी दोनशेहून अधिक वाहने उभी करता येतील.
700 कार आणि सोन्याचा जेट
ब्रुनेईचा सुलतान त्याच्या भव्य जीवनशैलीसाठी जगभरात ओळखला जातो. आलिशान गाड्यांपासून घोड्यांपर्यंत सर्व गोष्टींचा त्याला शौक आहे. त्याच्या तबेल्यात सुमारे 200 घोडे आहेत. याशिवाय त्यांच्याकडे 700 हून अधिक आलिशान कार आहेत. ज्यामध्ये 300 फेरारी आणि सुमारे 500 रोल्स रॉयल्स आहेत. त्यांची किंमत 5 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. सुलतान बोलकिया बोईंग ७४७ विमानाने उड्डाण करतात, ज्याची किंमत ३००० कोटींपेक्षा जास्त आहे. हे खाजगी विमान सोन्याचे आहे.
ब्रुनेई भारतासाठी का महत्त्वाचे?
ब्रुनेई हा छोटासा देश असून त्याच्याकडे तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे आहेत. त्याची अर्थव्यवस्थाही यावरच चालते. ब्रुनेईच्या हायड्रोकार्बन उद्योगात भारताने अंदाजे 270 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. अंतराळ तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. मुत्सद्देगिरीच्या दृष्टीकोनातून ब्रुनेई भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. विशेषत: इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनचा मुकाबला करण्यासाठी ब्रुनेईचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. त्यांची सीमा उत्तरेकडील दक्षिण चीन समुद्राला लागून आहे, जिथे त्यांचा चीनशी सतत वाद सुरू आहे.