Sanjay Raut : भाजप आमदार नितेश राणे यांचे एक वक्तव्य सध्या सर्वत्र चर्चेत आहे. अहमदनगर येथे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजप आमदार नितेश राणे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम धर्मियांबद्दल एक वादग्रस्त विधान केले, नितेश राणेंनी मुस्लिम समाजाला खुली धमकी देत म्हंटले होते, “जर आमच्या रामगिरी महाराजांच्या विरूद्ध काही कुणी बोललं तर मशिदी मध्ये येऊन एकेकाला मारेन’. नितेश राणेंच्या या वक्तव्यांनंतर राजकीय वातारण चांगलेच तापले.
यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिकिया उमटत आहेत. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत त्यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाच्या त्या आमदाराचे वडील आधी शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले. आता भाजपात आहेत” “आता हिंदुत्ववादी बनले आहेत. मशिदीत घुसून मारणार बोलतात. माझं मोदींना आवाहन आहे, अशा प्रकारची भाषा तुम्हाला मंजूर आहे का? मंजूर असेल, तर परदेशात जाऊन मशिदीत जाणं बंद करा. दुबई, सौदी अरेबिया आणि मलेशिया या इस्लामिक देशात जाऊन मोठमोठ्या नेत्यांची गळाभेट घेता, तिथे मशिदीत जाऊन धर्मनिरपेक्षतेचे धडे देता, हे ढोगं बंद करा” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
पुढे ते म्हणाले, “मशिदीत घुसून मारण्याबद्दल कोणी बोलत असेल, तर सरकारने काय केलं पाहिजे? मशिदीत घुसण्याची भाषा करणाऱ्या त्या आमदाराने आपल्या सरकारला सांगितलं पाहिजे, आधी पाकिस्तानात घुसून दहशतवादाविरुद्ध युद्ध छेडा. जम्मूत आर्मी बेसवर हल्ला झाला. एक जवान शहीद झाला. हे छोटे लोक गावात जाऊन भाषणं करतात. त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत” असा आरोप देखील संजय राऊत यांनी यावेळी केला.