Eknath Shinde : ऐन गणेशोत्सवात राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. ही संघटना आजपासून राज्यभर बेमुदत आंदोलन करणार आहे. राज्याकडून होत असलेल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.
तसेच ऐन उत्सवाच्या दिवसात प्रवाशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचे चित्र समोर आले आहे. लालपरीला ब्रेक लागणार असल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
एसटी कामगारांच्या संपावर एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्या आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल बैठक बोलवलेली आहे. यापूर्वीही एक बैठक पार पडली आहे. उद्याच्या बैठकीत सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आला आहे. एसटी ही गावोगावी फिरते, अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही संप करु नका. आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करु आणि चर्चेतून तुमचाही प्रश्न सुटेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि तसेच नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट ५००० रुपये हजार मिळावेत अशामागण्यांचा समावेश आहे.