Paralympics 2024 Highlights : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. देशाला एकाच दिवसात दोन सुवर्ण, तीन रौप्य तर तीन कांस्यपदके मिळाली. नुकतीच पार पडलेली पॅरिस ऑलिम्पिक भारतासाठी काही खास नव्हती. कारण यामध्ये 17 दिवसांत भारताच्या हाती केवळ 6 पदके आली.
अशा परिस्थितीत पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवसात जिंकलेली 8 पदके 150 कोटी भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. आता पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या पदकांची संख्या तीन सुवर्णांसह 15 वर पोहोचली आहे.
भारतासाठी ब्लॉकबस्टर दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे भालाफेकपटू सुमित अंतिल. त्याने केवळ सुवर्णाचा बचावच केला नाही तर पॅरिसमध्ये दोनदा आपलाच टोकियो पॅरालिम्पिकचा विक्रमही मोडला. आता विश्वविक्रम आणि पॅरालिम्पिक हे दोन्ही विक्रम भारतीय दिग्गज खेळाडूच्या नावावर आहेत.
योगेश कथुनियाने सोमवारी 2 सप्टेंबर रोजी पुरुषांच्या डिस्कस थ्रो F56 स्पर्धेत रौप्य जिंकून आपले दुसरे पॅरालिम्पिक पदक जिंकले. त्याने टोकियोमध्येही रौप्यपदक जिंकले आहे.
भारतीय पॅरा बॅडमिंटनसाठी ऐतिहासिक दिवस
भारतीय पॅरा बॅडमिंटन टीमने सोमवारी पाच पदके जिंकली. नितीश कुमारने पुरुष एकेरी SL3 मध्ये पहिले पॅरालिम्पिक सुवर्ण जिंकले, तर सुहास यथीराज आणि थुलासिमाथी मुरुगेसन यांनी अनुक्रमे SL4 आणि SU5 श्रेणींमध्ये रौप्य पदक जिंकले. यानंतर युवा मनीषा रामदासने महिला एकेरी SU5 मध्ये कांस्यपदक जिंकून यामध्ये भर घातली. नित्या श्री सिवनने 2024 पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये SH6 बॅडमिंटन प्रकारात कांस्यपदक जिंकले. भारतीय पॅरा बॅडमिंटनसाठी तो ऐतिहासिक दिवस होता.
धनुर्विद्येत कांस्य
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड तिरंदाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. सोमवार, 2 सप्टेंबर रोजी, या भारतीय जोडीने इटलीच्या मॅटेओ बोनासिना आणि एलिओनोरा यांचा इनव्हॅलिड्समध्ये 156-155 असा पराभव केला. यासह भारताने तीन वर्षांपूर्वी टोकियोमध्ये तुर्कियेने केलेल्या पॅरालिम्पिक विक्रमाची बरोबरी केली.