सर्वच पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी करत आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यातील शासकीय पदवी महाविद्यालयात सोमवारी मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीबाबत प्रशासनाकडून सुरक्षा उपाय देखील लागू करण्यात आले आहेत.
1 ऑक्टोबर 2024 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे.18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.जम्मू आणि काश्मीरमध्ये 88.06 लाख पात्र मतदार असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमधील ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे.
उधमपूर पूर्व, उधमपूर पश्चिम, चेनानी आणि रामनगर अशा चार मतदारसंघात ही निवडणूक पार पाडली जाणार आहे. उधमपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आमोद अशोक नागपुरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जिल्ह्यातील ही निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेणे याकडेच आमचे प्राधान्य आहे असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुरे म्हणाले आहेत.
या निवडणुकीसाठी भयमुक्त आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही अधिक सीआरपीएफ जवानांची मागणी केली आहे जम्मू-कश्मीर सशस्त्र दलाचे जवान आणि जिल्हा प्रशासन देखील या निवडणुकीसाठी तैनात केले जाईल अशी माहिती नागपुरे यांनी दिली आहे. मतदानाआधी आणि मतदानावेळी अशा दोन टप्प्यात सुरक्षा यंत्रणा विभागण्यात आली आहे. प्रशासनाने जिल्ह्यात शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.
पुढे बोलताना वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपुरे यांनी सांगितले आहे की, आम्ही निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीनंतर अश्या दोन्ही प्रकारची सुरक्षा देणार आहोत. निवडणुकीआधी मध्ये प्रचार आणि उमेदवारांच्या सुरक्षेबरोबरच मतदान ज्या ठिकाणी होणार आहे तेथील स्वच्छता आणि सुरक्षेची हमी घेणार आहोत. याचसोबत मतदानावेळी मतदान केंद्रांची काळजी देखील घेतली जाईल आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लाइंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्व्हिलन्सच्या पथकांना तैनात केले जाईल अशी माहिती नागपुरे यांनी दिली आहे.