North Korea : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याने 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, ज्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. किम जोंग यांची हुकूमशाही जगासाठी नवीन नाही. मात्र, आता त्यांच्या एका निर्णयामुळे जगभरातून प्रतिक्रिया उसळत आहे. नेमका काय आहे प्रकार जाणून घेऊया…
गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे तेथे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. पुरामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हा पूर रोखण्यात अपयश आल्याने संतप्त किम जोंग यांनी यासंदर्भातील 30 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. किम जोंग यांनी ज्या लोकांना शिक्षा सुनावली आहे त्या लोकांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे देखील दाखल आहेत.
चार हजारांहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुरामुळे चांगांग प्रांतातील काही भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. यामध्ये 4,000 हून लोकांचा मृत्यू झाला आहे. हुकूमशहा किम यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता. यावेळी पुराची तीव्रता पाहून ते संतापले आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली.
दक्षिण कोरियाच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूरग्रस्त भागात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या पक्षाच्या 20-30 प्रमुख व्यक्तींना एकाच वेळी फाशी देण्यात आली. याशिवाय, चांगांग प्रांताचे बडतर्फ पक्ष सचिव कांग बोंग-हून यांनाही या परिस्थितीसाठी अटक करण्यात आली. दरम्यान, उत्तर कोरियात फाशी देण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची ओळख अद्याप उघड झालेली नाही.