महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळातील (MSRTC) कर्मचाऱ्यांनी काल मंगळवार पासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे,या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे.मात्र एसटीच्या संपामुळे राज्यातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता या संपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde ) तातडीची बैठक बोलवली आहे.
आज मुख्यमंत्री शिंदे यांची एसटी कर्मचारी कृती समितीसोबत बैठक होणार आहे.आज संध्याकाळी 7 च्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मांडणार आहे. त्यामुळे आता या बैठकीत काही तोडगा निघतो का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मात्र २ दिवस चालू असलेल्या या संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली बघायला मिळाली आहे. तास अन् तास बसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी नियमितच्या वेळेपेक्षा जास्त वेळ खर्ची पडला.बंदचा परिमाण पुणे विभागात देखील पाहायला मिळाला. विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी) आणि पुणे स्टेशन या बसस्थानकातून नियमितपणे सुटणाऱ्या गाड्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी गाड्या रस्त्यावर धावत होत्या.
एसटी कामगारांच्या विविध मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी सातत्याने आंदोलन करूनही राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संपाचे हत्यार उपासले आहे. कर्मचारी संघटनांनी एकत्र येत मंगळवारपासून पुणे विभागातील सर्वच एसटी स्थानकात धरणे आंदोलन सुरु केले आहे.शिवाजीनगर आगाराला एसटी संपाचा मोठा फटका बसला. शिवाजीनगर आगारातून दिवसाला साधारण २६० बस मार्गस्थ होतात. मात्र मंगळवारी सायंकाळपर्यत केवळ ४६ बस आगारातून सुटल्या होत्या. तर, ५१ फेऱ्या रद्द झाल्या होत्या. खास करून बीड, लातूर, परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, सटाणा, नंदुरबार या भागात जाणाऱ्या बस रद्द झाल्या आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फायदा घेत खासगी वाहनचालकांनी दुप्पट भाडेवाढ केली आहे. एसटी बंद असल्याने झालेल्या अडचणीचा गैरफायदा घेत प्रवाशांची अक्षरश: लूट सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना एसटी संपामुळे बसफेऱ्या रद्द झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली आहे.आहे. या साठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.मुंबई सेंट्रल आगारातून कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर या संपाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एसटी बसेस आगारात न आल्याने कोकणात नियोजित असलेल्या एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.मुंबई सेंट्रल एसटी आगारात बसेस नसल्याने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली असून प्रवासी या स्थानकात अडकून पडले आहेत.