विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्यात जागा वाटपावरून चर्चा रंगताना दिसत आहे. असे असतानाच अनेक पक्षांच्या जागा वाटपावरून बैठक देखील पार पडल्या आहेत. लवकरच सर्व पक्षांकडून जागा वाटपाची यादी जाहीर केली जाणार आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेच्या १२ जागा आहेत. त्यातील भाजपकडे ६ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्याकडे ३-३ असे जागा वाटप केले आहे. परंतु राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून तीन नावे अद्याप जाहीर केली गेली नव्हती. यामुळेच मुंबई उच्च न्यायालयात या संबंधीची याचिका लांबणीवर आहे. यावरूनच न्यायालयाने आता तरी सदस्य निवडणार आहात का असा प्रश्न विचारलेला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना काही दिवसांमध्येच प्रक्रिया पूर्ण करू असे सरकारी वकिलांनी सांगितले आहे.असे असतानाच राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून नक्की कोणाची नावे दिली जातील याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानपरिषदेसाठी रूपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे, आणि आनंद परांजपे यांची नावे दिली जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच विधानपरिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर केली जातील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे मुंबई बँकेचे उपाध्यक्ष आहेत तर रूपाली चाकणकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असतात. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच विधानपरिषदेच्या या उमेदवारांची नावे राज्यपालांकडे पाठवली जातील अशी माहिती देण्यात आली आहे.