देशभरात विधानसभा निवडणुकांची तयारी सर्व पक्ष करत आहेत. जागा वाटपावरून वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीची भाजपकडून यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. बादशाहपूर मतदारसंघातून माजी मंत्री राव नरबीर सिंह आणि जवाहर यादव यांनी विधानसभा उमेदवारीसाठी दावा केला होता परंतु आता भाजप नेते जवाहर यादव यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे माजी मंत्री राव नरबीर सिंह यांना या निवडणुकीत भाजपकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हरियाणाच्या सर्व 90 विधानसभा जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार असून हे मतदान 5 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या मतदानाचा ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. बादशाहपूर भागात साडेचार लाख मतदार आहेत. तर हरियाणामध्ये ते सर्वाधिक आहेत . भाजपला या ठिकाणी राज्यसभा निवडणुकीत १.२ लाख मते मिळाली होती.
सोशल मिडियावरील एक्स अकाऊंटवरुन जवाहर यादव यांनी निवडणूक न लढवण्याची माहिती दिली आहे. मी निवडणूक लढवणार नाही. माझ्या माता भगिनींनी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी बादशाहपूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आतापर्यंत जे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. असे भाष्य त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत केले आहे. भाजप ज्याला उमेदवार म्हणून पाठवेल, त्याला विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा.असे देखील पुढे त्यांनी लिहिले आहे.
बादशाहपूर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे ओएसडी जवाहर यादव, पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमल यादव आणि माजी मंत्री राव नरबीर सिंह यांनी उमेदवारीसाठी दावा केला होता. यामध्ये नरबीर सिंह यांनी तिकीट मिळाले नाही तर पक्ष सोडण्याचा निर्णयही घेतला होता परंतु यावर अमित शाहा यांनी राव नरबीर सिंह यांची भेट घेतली होती. यानंतर नरबीर सिंह यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय रद्द केला असल्याचे सांगण्यात येत आहे.