Eknath Shinde : राज्यात काही महिन्यातच विधानसभा निवडणूका पार पडणार आहेत, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. तर सर्व बडे नेते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, अशातच आता विधसभा निवडणुकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवडणूक लवकर लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मुंबईतील एका कार्यक्रमात त्यांनी याबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी राज्यात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होतील असे संकेत दिले आहेत. येत्या दोन महिन्यात निवडणूका असल्याचे असं त्यांनी यावेळी म्हंटले आहे.
चांदिवली येथील मिठी नदी शेजारील व विमानतळ प्राधिकरणाच्या जागेवरील क्रांतीनगर व संदेश नगर येथील प्रकल्प बाधित झोपडपट्टीधारकांचे एचडीएल संकुल, कुर्ला येथे बांधलेल्या इमारतीत पुनर्वसन करण्यात आले. या सदनिकेच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी निवडणुकांबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघातून दिलीप लांडे यांना निवडून द्या, असे आवाहनही केले आहे.
यावेळी शिंदे यांनी पुनर्वसन प्रकल्प आणि लाडकी बहीण योजना यावरही भाष्य केले. पुनर्वसन प्रकल्पाबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “घर हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना देण्यात आली असून हे प्रकल्प पूर्ण करून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे उद्दिष्ट आहे.”
पुढे लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्याची तारीख आता वाढविण्यात आली आहे. ज्या महिलांनी अजूनही यासाठी अर्ज केला नाही त्यांना आता सप्टेंबरपर्यत अर्ज करता येणार आहे.