Devendra Fadnavis : राज्य सरकाराच्या लाडकी बहिणी योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकराने या योजनेची घोषणा केली होती. या योजनेवरून विरोधक सातत्याने राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत, अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर एक गंभीर आरोप केला आहे.
लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेलेली व्यक्ती ही नाना पटोले यांची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते, असा आरोप त्यांनी केला आहे. ते बुधवारी उदगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर जोरदार आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेकडे राजकीय चष्म्यातून पाहू नका. या योजनेला विरोध करुन का. ही योजना आपल्या बहिणींसाठी आहे. दिवसभर राबणाऱ्या महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा होतात तेव्हा त्यांना त्याचं मोल कळतं. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना या 1500 रुपयांचे मोल कळणार नाही. पण आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली काहीही झालं तरी ही योजना सुरु ठेवू. तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करु शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हंटले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात, या योजनेचा पहिला हप्ता आला असून, दुसरा हप्ता देखील लवकरच महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. दरम्यान, ज्या महिलांनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांना अजूनही वेळ आहे. महिला या योजनेअंतर्गत सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.