“आजच्या प्रचंड तणावपूर्ण अशा जीवनशैलीत योगासने आणि ध्यानधारणेची खूप मोठी गरज आहे.कारण आरोग्यमय दीर्घायुष्य जगायचे असेल तर ध्यान – धारणेला पर्याय नसल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केले आहे.
राष्ट्रपती मुर्मू आज लातूर मधल्या उदगीर येथे बोलत होत्या.राज्य शासनाच्या पुढाकाराने उदगीरला भव्य असे बुद्धविहार बांधले गेले आहे.त्याच्या लोकार्पण सोहळ्याला राष्ट्रपतींनी विशेष उपस्थिती लावली.तसेच राज्यशासनाच्या योजनांच्या लाभार्थी महिलांशीही यावेळी त्यांनी संवाद साधला.
त्या पुढे म्हणाल्या की ‘महाराष्ट्र सरकार जे काम करत आहे ते अतिशय कौतुकस्पद आहे.माझी बहीण लाडकी बहीण ही योजना किंवा लखपति दीदी सारखी योजना आणि त्या योजनांचा काही काळातच झालेला प्रचंड मोठा विस्तार पाहता मला खरंच आनंद होतो आहे.
यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री गिरिश महाजन,अदिती तटकरे आणि संजय बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले की, या उदगीरच्या धरतीने स्वातंत्र्याच्या दुसऱ्या लढाईत म्हणजेच मराठवाडा मुक्तिसंग्रामात देखील मोलाचे योगदान दिले आहे. आज त्याच पवित्र क्षेत्रात आम्ही पुन्हा एकदा नारीशक्तीचा गौरव करण्यासाठी एकत्रित आलो आहोत त्याचा अतिशय आनंद मला होत आहे. लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहिल्यावर लक्षात आले की आमची लाडकी बहीण योजना योग्य आहे. मात्र कितीही विरोध झाला तरी योजना बंद होणार नाही. हे देणारे सरकार आहे घेणारे नाही. असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
‘लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या लाडक्या बहिणींना सक्षम आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजनेसारखी योजना राबवतो आहोत मात्र अनेक विघ्न संतोषी लोक त्या योजनेत कसा खोडा घालता येईल हा प्रयत्न करत आहेत.पण त्यांचे मनसुबे आम्ही कधीच पूर्ण होऊ देणार नाहीत.2047 ला सशक्त भारत बनवायचा असेल तर महिला केंद्रीत योजना कराव्या लागतील. तसे झाल्यावरच आपण सशक्त भारत बनवू शकतो. मात्र लाडकी बहीण योजना बंद कारण्यासाठी कोर्टात गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचा आहे. काँग्रेसचे नाना पटोले यांचा निवडणूक प्रचार प्रमुख आहेत हे दुर्दैव आहे असे म्हणत फडणवीस यांनी नाना पटोले यांना टोला हाणला आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये भाषण करताना म्हणाले की, “आम्ही योजना आणली आहे बहीण लाडकी आणि हे पाहून विरोधी लोकांच्या मनात भरली आहे धडकी” यानंतर काही काळ हशा पिकला.
तर महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे विरोधकांवर टिका करताना म्हणाल्या की “आजवर महिलांसाठी इतक्या तत्परतेने योजना अख्या भारतभर फक्त आम्हीच राबवल्या आहेत.त्यामुळे विरोधक घाबरले आहेत.
या कार्यक्रमाला मोठया संख्येने महिला वर्गाची उपस्थिती होती.