पॅरिस पॅरालिम्पिंक स्पर्धेत भारताच्या दीप्ती जीवनजी हिने मोठी कामगिरी केली आहे. तिच्या यशाने भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. 400 मीटर महिला रेस T20 प्रकारात दीप्ती जीवनजी हिने कांस्यपदक पटकावले आहे. 2024 मध्ये पॅरिस पॅरालिम्पिंक स्पर्धेत भारताला मिळालेले हे 16 वे पदक आहे.
५५.८२ सेकंदात तिने रेस पूर्ण करून हे पदक जिंकले आहे. दीप्ती पहिल्यांदाच पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली होती. एकीकडे भारताच्या दीप्तीने ५५.८२ सेकंदात रेस पूर्ण केली आणि कांस्यपदक पटकावले तर तुर्कीच्या एसेल ओंडरने रौप्य पदक पटकावले आहे.तुर्कीच्या एसेल ओंडरने 55.23 सेकंदात रेस पूर्ण केली. युक्रेनच्या युलिया शुलियरने 400 मीटरची शर्यत 55.16 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले आहे.
कोबे या ठिकाणी यावर्षी पॅराॲथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या होत्या यामध्ये दीप्ती जीवणजी हिने वर्ल्ड रेकॉर्ड केले होते. तसेच 2022 मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्येही ती सुवर्णपदक विजेती ठरली होती.
दीप्ती जीवनजी केवळ 21 वर्षांची असून तिचा जन्म 27 सप्टेंबर 2003 रोजी तेलंगणातील कालेरा गावात झाला आहे. . पॅरालिम्पिक T20 हा प्रकार मानसिकदृष्ट्या अपंग खेळाडूंसाठी राखीव आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दीप्ती जीवणजीची आई धनलक्ष्मी जीवनजी आणि वडील यादगिरी जीवनजी यांनी सांगितले आहे की दीप्तीचा जन्म सूर्यग्रहणाच्या वेळी झाला होता. ती जन्मतःच मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. यामुळे बोलण्यात किंवा कोणतेही काम करण्यात तिला अडचणी येत होत्या.मात्र या सगळ्यावर जिद्दीने मात करत आज तिने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.