पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकताच ब्रुनेई दौरा आटपून सिंगापूर दौऱ्यावर पोचले आहेत. भारतीय नागरिकांनी त्यांचे सिंगापूरमध्ये जंगी स्वागत केले आहे. तसेच भारतीय उच्चायुक्त शिल्पक अंबुले, सिंगापूरचे भारतातील उच्चायुक्त सायमन वोंग आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांचे सिंगापूरमध्ये स्वागत केले आहे. यावेळी ढोल ताशे वाजवत पंतप्रधानांचे स्वागत केले गेले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावेळी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलेला दिसून आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत-सिंगापूर मधील धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने सिंगापूर दौऱ्यावर गेले आहेत. या ठिकाणी जाऊन ते भारत-सिंगापूर यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची प्रगती याचा आढावा घेणार आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांची देखील भेट घेणार आहेत. सिंगापूरला जाण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी निवेदन जारी केले होते. सिंगापूरसोबतची आमची धोरणात्मक भागीदारी, प्रगत उत्पादन, डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रांवर चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे असे निवेदनात पंतप्रधानांनी सांगितले आहे.
याआधी पंतप्रधान मोदींनी बंदर सेरी बेगवान येथील इस्ताना नुरुल इमान येथे ब्रुनेईचा सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्याशी “विस्तृत” चर्चा केली आहे. त्यांच्या चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ कसे करता येईल यावर चर्चा केली आहे. याबाबत पंतप्रधानांनी X वर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की , “महाराज सुलतान हाजी हसनल बोलकिया यांना भेटून आनंद झाला. आमची चर्चा विस्तृत होती आणि त्यात आमच्या राष्ट्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली आहे.
दरम्यान, याआधी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंगापूरला भेट दिली होती.