Puja Khedkar : गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चेचा विषय ठरत असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या अडचणीत आता आणखीनच वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात एक महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला आहे. मागील काही दिवसांमध्ये पूजा खेडकर यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. यापैकी एक म्हणजे खोटे अपंगत्वाचे प्रमाणपत्र वापरुन यूपीएससी परीक्षा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी यूपीएससी आयोगाने पूजा खेडकर हिला निलंबित केले आहे. तसेच भविष्यात कोणत्याच परीक्षेला बसता येणार नाही अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली. इतकेच नाही तर तिने परीक्षेत कमी गुण मिळूनही सवलतींच्या आधारे परीक्षा उत्तीर्ण केली. तिने UPSC मध्ये 841 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवले. पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासादरम्यान तिने बनावट अपंगत्व प्रमाणपत्र बनवले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टनुसार, पूजा खेडकरने 2022 आणि 2024 मध्ये अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाकडून मिळवलेली दोन अपंगत्व प्रमाणपत्रे ही बनावट असू शकतात. पण त्यांची वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी केली असता त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे पूजा खेडकर दावा करत असलेले अपंगत्व प्रमाणपत्र वैद्यकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेले नसावे, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
तसेच, आपण सिव्हिल सर्जन कार्यालयातील नोंदीनुसार अपंगत्व प्रमाणपत्र दिले नसल्याचा दावाही वैद्यकीय प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचेही प्राधिकरणाने आपल्या उत्तरात म्हटले आहे. त्यामुळे पुजा खेडकरने सादर केलेले प्रमाणपत्र हे बनावट असल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.