Narayan Rane : भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत एक विधान केले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनच्या मार्फत त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी केला आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन नारायण राणे हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत होते. परंतु दिशाच्या मृत्यू प्रकरणाची अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी अजूनही तपास सुरू आहे. घराच्या बाल्कनीतून खाली पडून दिशाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत यामागे आदित्य ठाकरे यांचा हाथ असल्याचे बोलले होते.
पत्रकार परिषदेत बोलताना राणे म्हणाले, “मिलिंद नार्वेकर यांनी मला फोन केला आणि फोनवरून उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले यावेळी ते मला म्हणाले आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुलं आहेत…” असा दावा राणेंकडून करण्यात येत आहे.
दरम्यान यावेळी त्यांनी, सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली. मालवण येथील घटनेनंतर विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत, यावरच नारायण राणे म्हणाले, “पुतळा कोसळल्याच्या घटनेला अनेक दिवस होऊन गेले आहेत यामुळे मी विनंती करतो की, जे लोकांच्या उपयोगी आहेत असे विषय घ्या, तसेच महाराजांचा दर्जेदार पुतळा लवकरच बनवला जाणार आहे.” असेही यावेळी ते म्हणाले.