भारताच्या अनेक खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत खेळाडूंनी आतापर्यंत 20 पदके जिंकली आहेत. या कामगिरीसह खेळाडूंनी भारताचा झेंडा जगभर पसरवला आहे. भारतीयांकडून देखील या खेळाडूंचे कौतुक करण्यात येत आहे. दरम्यान, पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत पॅरा-ॲथलीट स्पर्धेत महाराष्ट्राच्या सचिन खिलारी याने रौप्य पदक जिंकत सर्वांची मने जिंकली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सचिन यांचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.
सचिनने या स्पर्धेत 16.32 मीटर थ्रो केला आणि रौप्य पदक मिळवले. सचिनचे सुवर्णपदक फक्त 0.6 मीटरने हुकले आहे. त्याच्या या कामगिरीनंतर पंतप्रधान मोदींनी कौतुक करणारी पोस्ट एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. सचिन खिलारीचे अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की, “ताकद आणि दृढनिश्चयाच्या उल्लेखनीय स्पर्धेत पुरुषांच्या शॉटपुट F46 स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या सचिन खिलारी यांचे अभिनंदन, त्यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुकाची थाप दिली आहे.
सचिनने अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी त्याने आशियाई पॅरागेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक पॅराॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 आणि 2024 मध्ये पदके जिंकून त्याने लाखो भारतीयांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
सोमवार आणि मंगळवारच्या खेळाबद्दल बोलायचे झाल्यास या स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत देशासाठी २० पदके जिंकली आहेत. यामध्ये तीन सुवर्ण पदकासह, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे.