Haryana Assembly : हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 67 नावांची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांना लाडवा मतदारसंघातून, तर अनिल विज यांना अंबाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अरविंद शर्मा यांना गुहाना मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे.
या यादीतील विशेष बाब म्हणजे यात जेजेपीच्या (Jannayak Janta Party) तीन माजी आमदारांनाही तिकीट देण्यात आले आहे. देवेंद्र बबली यांना तोहाना, रामकुमार गौतम यांना सफिडॉन आणि अनूप धनक यांना उकलाना येथून तिकीट मिळाले आहे.
9 विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द, दोन आमदारांच्या जागा बदलल्या
पहिल्या यादीनुसार भाजपने 9 विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द केली आहेत. पलवलमधून दीपक मंगला, फरिदाबादमधून नरेंद्र गुप्ता, गुरुग्राममधून सुधीर सिंगला, बावानी खेडामधून विशंभर वाल्मिकी, रानियामधून कॅबिनेट मंत्री रणजित चौटाला, अटेलीमधून सीताराम यादव, पेहवामधून माजी मंत्री संदीप सिंह, सोहनामधून राज्यमंत्री संजय सिंह आणि त्याचप्रमाणे फरिदाबादमधून लक्ष्मण नापाचे तिकीट रद्द करण्यात आले आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत काय खास आहे?
लोकसभा निवडणुकीत रोहतकमधून निवडणूक लढवलेले अरविंद शर्मा यांना गोहाना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री नायबसिंग सैनी कर्नालमधून नाही तर कुरुक्षेत्र लोकसभेत येणाऱ्या लाडवामधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी भाजपने जगमोहन आनंद यांना कर्नालमधून उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे बावनीखेडा येथील विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री बिशंबर वाल्मिकी यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. श्रुती चौधरीला तोशामचे तिकीट मिळाले आहे. अटेली मधून आरती राव यांना तिकीट मिळाले आहे ज्या इंद्रजीत राव यांची मुलगी आहेत.
किती जागांसाठी आणि कधी होणार मतदान?
हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. हरियाणातील सर्व 90 जागांवर 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 8 ऑक्टोबर रोजी मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल येतील. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. विधानसभेच्या शेवटच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या.