Paralympic Games Paris 2024 : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. अनेक खेळाडूंनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये विजय मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे भारताची मान उंचावलेली आहे. अशातच एका खेळाडूचे नाव सर्वत्र चर्चेत आहे ते म्हणजे, धरमबीर याचे, त्याने क्लब थ्रो F51 स्पर्धेत चमकदार कामगीरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.
या स्पर्धेत प्रणव सुरमाने 34.59 मीटर क्लब थ्रो करून रौप्यपदक मिळवलेले आहे. तर धरमबीरने 34.92 मीटरक्लब थ्रो करून सुवर्णपदक मिळवलेले आहे. मात्र, धरमबीरचा सुवर्णपदका पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. येथे पोहोचण्यासाठी त्याला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले.
लहानपणी पोहताना त्याच्या पाठीला दुखापत झाली होती आणि यानंतर धरमबीर अर्धांगवायूचा बळी ठरला होता. त्याच्या पाठीच्या खालच्या भागाने काम करणे बंद केले होते आणि तो पुन्हा कधीही चालू शकणार नाही असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते.
परंतु त्याला यातून लवकर बाहेर पडायचे होते आणि यामुळेच त्याने खेळाची आवड निर्माण केली. यानंतर धरमबीरला क्लब थ्रोची आवड निर्माण झाली. 2014 मध्ये त्याला या खेळाची माहिती मिळाली होती. या काळात धरमबीरला अमित कुमार सरोहा यांचे मार्गदर्शन मिळाले. यानंतर धरमबीरने कधीही मागे वळून पाहिले नाही.
यापूर्वी धरमबिरने हँगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतासाठी रौप्य पदक देखील जिंकले आहे. 2022 आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने क्लब थ्रो आणि डिस्कस थ्रोमध्ये त्याने दोन पदके जिंकली आहेत. तसेच हरियाणा सरकारकडून त्यांना भीम पुरस्कार देखील मिळालेला आहे.
दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत 24 पदके मिळालेली आहेत. 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 10 कांस्यपदकांचा यामध्ये समावेश आहे.