देशभरात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार चालू आहे. सर्व पक्षांच्या जागा वाटपावरून बैठक देखील होत आहेत. अनेक नेते आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून पक्षांतर देखील करत आहेत. तर काही नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. अस असतानाच आता राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी होणार का अशा चर्चाणा उधाण आले आहे.
राज्यातील छोटे पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी तयार करतील असे चित्र दिसून येत आहे. छत्रपती संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष, राजरत्न आंबेडकर व माजी सैनिक तसेच शेतकरी घटक पक्षांना एकत्रित घेवून पुण्यात आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तिसरी आघाडी तयार करण्याबाबत चर्चा होणार आहे.
स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे बच्चू कडू, डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे पंतु राजरत्न आंबेडकर आणि इतर नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याआधी पुणे, मुंबई येथे तिसरी आघाडी तयार करण्याबाबत दोन बैठक झाल्या होत्या. स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे, प्रहार पक्ष प्रमुख बच्चू कडू हे देखील पुणे, मुंबई मधील बैठकीला उपस्थित होते यामुळेच आता तिसरी आघाडी होणार का अशा चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, ही बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत राज्यात आता तिसरी आघाडी होणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.