Building Collapse Malad Mumbai : मुंबईतील मालाड पूर्व येथे भीषण अपघात झाला आहे. येथे गोविंद नगर परिसरात एका बांधकाम इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत. ज्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.दरम्यान, या घटनेत आणखी चार कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील नवजीवन इमारतीच्या 20 व्या मजल्याचा स्लॅब आज दुपारी १२ वाजता कोसळला. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत ही इमारत बांधण्यात येत आहे.
या घटनेबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने ही दुर्घटना घडली आहे. जखमी कामगारांना जवळच्या एमडब्ल्यू देसाई रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी दोन मजुरांना मृत घोषित केले. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.