नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावात शहराला हादरवून टाकणारी प्रचंड खळबळजनक घटना घडली आहे.चक्क घरात झोपलेल्या एका मुलीच्या अंगावर ॲसिड हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातल्या इस्लामाबाद भागात मंगळवारी रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीने एकच कुटुंबातील तिघांवर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली. मोहम्मद लुकमान व त्यांच्या पत्नी नूजहत परवीन व मुलगी मरियम अहमद हे तिघे मंगळवारी रात्री त्यांच्या घरात झोपलेले असताना अज्ञाताने घरात प्रवेश करत तिघांवर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मरियमचे येत्या २ महिन्यात लग्न असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे,या घटनेमागे माथेफिर एकतर्फी प्रेमाचा विषय आहे का ? असा तपास पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पीडित कुटुंबीयांच्या घरात ॲसिड फेकल्यानंतर हल्लेखोराने लगेचच पळ काढला. झोपेतच ॲसिड हल्ला झाल्याने घरातील कुटुंबीयांनी मोठ्याने आरडाओरड केली. त्यांच्या जोरदार ओरडण्याचा आवाजाने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात मरियम, लुकमान यांना गंभीर दुखापत झाली आहे. घरात ॲसिड फेकल्याने संपूर्ण घर धुराने भरले होते. घटनेनंतर लागलीच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मरियम व लुकमान यांना अधिक उपचारासाठी डॉक्टरांनी धुळ्यातील रुग्णालयात पाठविले आहे. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत हल्लेखोराचा शोध घेतला जात होता.
मालेगाव शहरात ॲसिड हल्ल्याची ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबरटीचे वातावरण निर्माण झाले आहे.