Ganesh Chaturthi : दरवर्षी सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गणेश उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे.
गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी दरवर्षी पोलिसांकडून अनेक अटी आणि नियम लावले जातात. त्याचप्रमाणे यावर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खास उपक्रम राबविला जाणार आहे.
हा उपक्रम खास पुणेकरांसाठी असून मूर्ती आमची किंमत तुमची असे या उपक्रमाचे नाव आहे. या उपक्रमातून नागरिकांनी पीओपीची मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती घ्यावी असे सांगण्यात येत आहे.
महापालिकेच्या पर्यावरण विभाग आणि लिबर्टी अर्थवेअर आर्ट या संस्थेकडून हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विसर्जन करताना या मूर्ती दोन तासात पाण्यात विरघळतात आणि या मातीचा वापर आपण कुंडीसाठी देखील करू शकतो.
नागरिकांनी पीओपीची मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती घ्यावी आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत शाडू मातीची मूर्ती घोले रस्ता आर्ट गॅलरी येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येथून तुम्ही तुमच्या आवडीची मूर्ती अगदी तुम्हाला हवी त्या किमतीत घेऊ शकता.
दरम्यान, पुणे महापालिकेकडून गणपती विसर्जनासाठी हौदाची देखील सोय करून देण्यात आली आहे. याचसोबत मूर्ती दान संकलन केंद्र देखील सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी मूर्ती दान केल्यास तीन किलो खत देण्यात येणार आहे.