मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता शिवसेनेकडून राज्यात ‘लाडकी बहिण कुटुंब भेट’ अभियान राबवले जाणार आहे. या अभियानात शिवसेनेचे ५० हजार कार्यकर्ते १ कोटी महिलांना भेटून संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या अभियानासंदर्भात माहिती देताना निरुपम म्हणाले की, लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘लाडकी बहिण कुटुंब भेट’ अभियानाचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील ७० ते ८० विधानसभा मतदार संघांवर शिवसेनेने लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदार संघात प्रत्येक कार्यकर्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, असे हमीपत्र घेऊन १० लाडक्या बहिणींच्या घरी पोहोचेल, असे निरुपम म्हणाले आहेत.
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून हे अभियान तयार करण्यात आले आहे. निरुपम पुढे म्हणाले की, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी शिवसेना कार्यकर्ते लाडक्या बहिणींच्या घरी जातील. दररोज किमान ५ लाख आणि महिनाभरात ६० लाख लाडक्या बहिणींच्या घरी या अभियानातून संपर्क साधला जाईल, असे निरुपम यांनी सांगितले आहे. या अभियानात सर्वच कार्यकर्त्यांच्या मोबाईलमध्ये विशेष ॲपचा समावेश असेल. या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग असून कार्यकर्त्याने केलेला संपर्क, तिथं दिलेला वेळ समजेल. लाडक्या बहिणींचा योजनेबाबतचा अनुभव आणि सूचनांची नोंद केली जाईल. गरज पडल्यास ॲपमधून नाव नोंदणी देखील केली जाईल, असे निरुपम म्हणाले आहेत. .
*लाडकी बहिण कुटुंब भेट अभियानाची वैशिष्ट्ये*
-मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील महिला लाभार्थींशी भेट कार्यक्रम
-राज्यातील १ कोटी महिलांशी भेटून संवाद साधणार
-शिवसेनेचे ५० हजार कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार
-७० ते ८० विधानसभा मतदार संघांमध्ये लाडकी बहिण कुटुंब भेट अभियान
-प्रत्येक मतदार संघात ६०० ते १००० कार्यकर्ते घरोघरी जाणार
-शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस अभियान चालणार
-दररोज प्रत्येक कार्यकर्ता किमान १० घरांना भेटी देणार
-दररोज किमान ५ लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य
-आठवड्यातील तीन दिवसांत १५ लाख घरांना भेटी देणार
-एका महिन्यात ६० लाख घरांना भेट देऊन लाडक्या बहिणीशी संवाद साधणार
या अभियानातून १ कोटी महिलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
-या अभियानात कार्यकर्त्याच्या मोबाईलमध्ये विशेष ॲप समावेश असणार
-या ॲपमध्ये जिओ ट्रॅकिंग, कार्यकर्त्याने केलेला संपर्क, वेळ समजणार
गरज पडल्यास या ॲपमधून लाडकी बहिण योजनेबाबत अर्ज भरला जाणार
लाडकी बहिण योजनेबाबत महिलांकडून प्रतिक्रिया जाणून घेणार