Mohammad Yunus : नवीन सरकार स्थापन झाल्यापासून बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंध बिघडत चालले आहे. बांगलादेशचे अंतरिम सरकार वारंवार भारताला डिवचण्याचे काम करत आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे, भारताने शेख हसीना यांना दिलेला आश्रय. यामुळेच शेजारील देशातून अनेकवेळा वादग्रस्त वक्तव्य केलं जात आहे.
अशातच बांग्लादेशाचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना आणि भारताबाबत मोठे एक वक्तव्य केलं आहे. बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस म्हणाले आहेत की, “ते हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे करणार आहेत. मात्र, तोपर्यंत हसीनाने मौन बाळगावे. अन्यथा दोन्ही देशांत समस्या निर्माण होऊ शकतात. मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणानंतर गुन्हा दाखल करण्याबाबतही सांगितले.
यावेळी युनूस म्हणाले, “हसिना जर गप्प राहिल्या असत्या तर आम्ही विसरलो असतो, लोकही विसरले असते, पण त्यांनी भारतात बसून वक्तव्य केले तर ते कोणालाच आवडणार नाही. अशा स्थितीत त्यांनी मौन बाळगावे.”
शेख हसीना यांनी केले होते ‘हे’ वक्तव्य
बांगलादेशातील राजकीय सत्तापालटानंतर शेख हसीना ढाका सोडून भारतात आल्या, तेव्हापासून त्यांना भारतात आश्रय मिळाला आहे. मात्र, त्या बांगलादेशातील परिस्थितीबाबत वेळोवेळी वक्तव्ये करत आहेत. शेख हसीना यांनी 13 ऑगस्ट रोजी एक वक्तव्य केले होते, ज्यात त्यांनी बांगलादेशातील हत्या आणि हिंसाचार ही दहशतवादी घटना असल्याचे म्हटले होते. शेख हसीना यांच्या या वक्तव्यानंतर अंतरिम सरकारच्या प्रमुखांनी त्यांना गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे.
भारताला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल
अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनीही भारताबाबतही आपली भूमिका मांडली. शेख हसीना यांची ही विधाने भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांसाठी चांगली नाहीत, असे त्यांनी यावेळी सांगितले. बांगलादेश भारताशी मजबूत संबंधांना महत्त्व देतो, परंतु भारत शेख हसीना यांच्या अवामी लीग वगळता इतर पक्षांना इस्लामिक पक्ष म्हणून पाहतो, भारताला हा दृष्टिकोन बदलावा लागेल.”
दरम्यान, शेख हसीना यांनी बांगलादेश लवकरच अफगाणिस्तान होईल असे वक्तव्य केले होते, त्यावर युनूस म्हणाले, “दुसऱ्या पक्षाच्या सरकारमध्ये बांगलादेश अफगाणिस्तान बनेल असे नाही. हसीना यांची देश सोडण्याची कारणे साधी नाहीत, सार्वजनिक बंड आणि संतापामुळे त्यांना पळून जावे लागले.”
मोहम्मद युनूस यांना विचारण्यात आले की, अंतरिम सरकारमध्येही हिंदू आणि अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. तर याला प्रत्युत्तर देताना युनूस म्हणाले की, हे फक्त एक निमित्त आहे. असे हल्ले मोठे करून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
माहितीसाठी शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या अनेक बातम्या आल्या होत्या. पंतप्रधान मोदींनी देखील 15 ऑगस्टच्या भाषणात याचा उल्लेख केला होता.