नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि विकासाचे एक नवीन पर्व पाहायला मिळत आहे आणि दहशतवाद्यांचे केंद्र पर्यटन स्थळात बदलले आहे. असे प्रतिपादन भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले आहे.
आज ते जम्मू काश्मीर येथे दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात असून भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. त्यांच्या नियोजित दौऱ्यानुसार, अमित शाह आज भारतीय जनता पक्षाच्या संकल्प पत्राचे लोकार्पण करतील आणि उद्या ते ‘कार्यकर्ता संमेलन’ येथे कार्यकर्त्यांची भेट आणि संवाद साधतील.
एक्स वरील सोशल मीडिया पोस्टवर अमित शाह यांनी लिहिले आहे की , “J&K मोदी सरकारच्या काळात शांतता आणि विकासाच्या एका नवीन पर्वाचे साक्षीदार आहे. शैक्षणिक आणि आर्थिक वाढीसह माझ्या दोन दिवसीय दौऱ्यावर जम्मूला रवाना होत आहे, जिथे मी आज भाजपच्या संकल्प पत्राचा शुभारंभ करीन आणि उद्या कार्यकर्ता संमेलनात आमच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधेंन”.
जम्मू-काश्मीरमध्ये 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यांत निवडणुका होणार आहेत.जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये 7 जागा अनुसूचित जाती (SC) आणि 9 अनुसूचित जमाती (ST) साठी राखीव आहेत.8 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.
मागील विधानसभा निवडणुकीत, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ने 28 जागा जिंकल्या, भारतीय जनता पार्टी (भाजप) ने 25, जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (NC) ने 15 आणि काँग्रेसने 12 जागा जिंकल्या होत्या .