बाप्पाच्या आगमनाने महाराष्ट्रात सध्या आनंददायी आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले आहे. महाराष्ट्रात पुणे शहरातील गणेशोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी देखील होत असते.
यावर्षी देखील नेहमीप्रमाणे अनेक मंडळांनी गणेशोत्सवाचे आकर्षक देखावे सादर केले आहेत. दरम्यान, पुण्यातील एका मंडळाने साकारलेल्या गणेशोत्सवातील देखाव्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळाने अमृतसर मधील प्रसिद्ध ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा उभारला असून यावरून वाद निर्माण झाला आहे.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीकडून यासाठी विरोध केला जात आहे. या समितीकडून मंडळावर कारवाईची करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळात ‘गोल्डन टेम्पल’चा देखावा उभारण्याचे काम सुरू आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने यावर आक्षेप घेतला असून कमीटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. अमृतसरचे सुवर्ण मंदिर म्हणजेच ‘गोल्डन टेम्पल’ हे शिखांचे पवित्र स्थळ आहे. त्यामुळे गणेश मंडळ त्याचा देखावा सादर करु शकत नाही. यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दरम्यान, सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी मंडळाला परवानगी दिली नाही असे कॅम्प येथील गुरुद्वारातील विश्वस्तांनी सांगितले आहे.
यानंतर आता छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुवर्ण मंदिर आमच्यासाठी आदराचे स्थान असून आम्ही नांदेडच्या गुरुद्वाराला 12 जुलै रोजी याबाबत पत्र देखील पाठवले होते. आमचे गणेश मंडळ सुवर्ण मंदिराची प्रतिकृती तयार करणार असून त्यासाठी आशीर्वाद द्यावेत अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून केली होती. आम्ही पुण्यातील सर्व 40 गुरुद्वारांकडे पाठपुरावा करुन आमची सुवर्ण मंदिर देखावा याबाबतीची कल्पना सांगितली होती असे देखील छत्रपती राजाराम मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, आम्ही काहीही चुकीचे होऊ देणार नाही असे देखील युवराज निंबाळकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.