सध्या देशभरात राज्यपाल नियुक्त 12 जागांचीच चर्चा सुरू आहे. या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. राज्यपाल नियुक्त 12 जागावाटपाचा फॉर्म्युला देखील ठरला आहे. यामध्ये भाजपला 6 आणि शिवसेना राष्ट्रवादी पक्षाला 3-3 अशा जागा देण्यात येणार आहेत. परंतु आता मुख्यमंत्री कोणती तीन नावे राज्यपालांकडे पाठवणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिंदे गटाकडे 3 जागा असून या जागांसाठी 30 जन इच्छुक आहेत. या 30 जणांनी आपली बाजू शिवसेना पक्षातील नेत्यांसमोर मांडलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला आमदारकीची संधी देतील असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. यामध्ये दीपक सावंत यांची विधान परिषद आमदार पदी नियुक्ती करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याचसोबत मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांना देखील संधी मिळू शकते.
विधान परिषदेच्या माजी आमदार मनीषा कांयदे, पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे संजय मोरे, गिरीश पांडव यांना देखील आमदारकीची संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा आहे परंतु त्यांच्या नावावर रुपाली पाटील ठोंबरे यांनी आक्षेप घेतला असून एकाच महिलेकडे किती पदे देणार, असा प्रश उपस्थित केला आहे. यामुळे रुपाली चाकणकर यांना संधी मिळणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.