काल सांगलीतल्या कडेगाव येथे पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थिती लावली होती व त्यावेळी बोलताना त्यांनी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.त्यांनी म्हटलं होते की, ‘चुकीचे काम करणारा माणूस माफी मागतो.त्यानुसार मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी माफी मागितली आहे.
राहुल गांधींच्या या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत चांगलाच घणाघात केला आहे. ते म्हणाले आहेत की,’मध्यप्रदेश मध्ये छिंदवाडात कॉँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीने पाडून टाकला होता, यावर राहुल गांधी माफी मागतील का ? तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या ‘डिस्कवरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात देशप्रेमात ‘वाट चुकलेला देशभक्त’ अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांची हेटाळणी केली,याचे उत्तर राहुल गांधी देणार आहेत का ?
मविआ चे घटक पक्ष छत्रपती शिवरायांच्या वंशजांकडून पुरावे मागतात. शाहिस्तेखान,अफझलखान नसते तर शिवरायांची ओळख नसती असे वक्तव्य करण्याचे धाडस करतात.त्यावेळी राहुल गांधींनी शिवरायांची,महाराष्ट्राची माफी मागितली नव्हती असे म्हणत बावनकुळेंनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे,असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना काही परखड सवालही केले. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना या ना त्या प्रकारे रेटून खोटे बोलत राज्यात अशांतता पसरवण्याचा ‘मविआ’ चा कट आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी काँग्रेस, मविआवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान,सध्या महाराष्ट्रात सिंधुदुर्गातील मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कॉसळल्या नंतर राज्यातील राजकारण खूप तापले आहे. ,यावर राजकीय वर्तुळात अनेक उलट – सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच त्या जागेवर भव्य पुतळा उभारू असे आश्वासन राज्याच्या जनतेला दिले आहे.