Ganesh Chaturthi 2024 : दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो यावर्षी देखील गणेशाचे आगमन मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात होत आहे. भाविकांकडून गणेशाचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. पुण्यात अनेक मंडळांकडून गणेशोत्सवासाठी वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले आहेत. गणपती आगमनाच्या पहिल्या दिवसापासूनच भाविकांची देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होत असते.
याच पार्श्ववभूमीवर प्रशासनाकडून अनेक नियम व अटी लागू करण्यात येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पोलिसांकडून अनेक नियम आणि अटी लागू करण्यात आले आहेत, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील 16 मध्यवर्ती रस्ते गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच शहरातील बारा रस्त्यांवर जड वाहनांसाठी बंदी घालण्यात येणार आहे.
यामध्ये शास्त्री रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड, केळकर रोड, बाजीराव रोड, शिवजी रोड, कर्वे रोड, एफसी कॉलेज रोड, जंगली महाराज रोड, सिंहगड रोड, गणेश रोड येथे जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच शिवाजी रोड-गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक परिसर वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करायला सांगितला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गाचा वापर करावा लागेल. शिवाजीनगर येथून शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून, जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळकमार्गाचा वापर करावा.
दरम्यान, हे वाहतूक बदल पाच ते सात सप्टेंबर या काळात सकाळी सहा ते रात्री १२ पर्यंत असणार आहे.