सध्या देशभरात आगामी विधानसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. असं असतानाच आता भाजपने काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेसकडून नुकतीच हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी 31 उमेदवारांची यादी जाहीर केली गेली. सुरेंद्र पनवार यांचे या यादीमध्ये नाव आहे. सुरेंद्र पनवार यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरु आहे. यावरूनच आता भाजपचे जेष्ठ नेते अनिल वीज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गुन्हे करून तुरुंगात जाणे काँग्रेसची आवडती गोष्ट असून तुरुंगात असणाऱ्या लोकांचीच नावे निवडणुकीसाठी जाहीर केली गेली आहेत. यामध्ये सुरेंद्र पनवार, भूपेंद्रसिंह हुड्डा यांची नावे आहेत. यांच्यावर गुन्हे दाखल असून त्यांची नावे उमेदवारीच्या यादीत आहेत आता अशी किती नावे उमेदवारीच्या यादीत येतील ते पहा असे वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते अनिल वीज यांनी केले आहे.
सध्या काँग्रेसकडून हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी तीन आमदारांना तिकीट देण्यात आले आहे परंतु यामध्ये काहीजण असे आहेत ज्यांच्या विरोधात ईडीकडून तपास सुरू आहे. या यादीत सुरेंद्र पनवार, समलखा येथील धर्म सिंह छक्कर आणि महेंद्रगड मधील राव दान सिंह यांचा यामध्ये समावेश आहे.
तर सुरेंद्र पनवार यांच्या घरावर बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी एडीने छाप टाकली होती त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता काँग्रेसकडून त्यांचे नाव उमेदवारीच्या यादीत आल्यामुळे भाजपाकडून काँग्रेसवर जोरदार टीका करण्यात येत आहे.
दरम्यान हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी एकाच टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. ५ ऑक्टोबर२०२४ रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर ८ ऑक्टोबर रोजी लगेच याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.