लालबागचा राजाची स्थापना इ.स. १९३४ साली करण्यात आली. 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात भायखळा आणि लालबाग परिसराजवळील जागा व्यापणाऱ्या रस्त्यावरील विक्रेत्यांना झपाट्याने वाढणाऱ्या मुंबई शहराच्या नागरी पायाभूत सुविधांसाठी जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले होते. लालबाग परिसरातील लहानशा गणपती मंदिरात रस्त्यावरच्या विक्रेत्यांनी त्यांची आणि त्यांच्या उपजीविकेची काळजी घेण्यासाठी प्रार्थना केली. त्याचे असे झाले की त्या दिवशीच्या प्रशासनाने विस्थापित रस्त्यावरील विक्रेत्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नवीन योजना आणली. त्यावेळचे शामराव विष्णू बोधे, नगरसेवक कुंवरजी जेठाभाई शाह, डॉ. व्ही.बी. कोरगांवकर, नाकवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे, डॉ. यु.ए. राव यांच्या प्रयत्नाने जागेचे मालक रजबअली तय्यबअली यांनी आपली जागा बाजार बांधण्यास दिली. त्यामुळे इ.स. १९३४ साली होडी वल्हवणाऱ्या दर्यासारंगाच्या रूपात ‘श्री’ची स्थापना झाली. येथूनच ‘नवसाला पावणारा लालबागचा राजा’ म्हणून हा गणपती ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून गणेश चतुर्थी मोठ्या दिमाखात साजरी करून त्यांच्या नवसाची परतफेड करण्याचा निर्णय या लोकांनी घेतला.ह्या लालबागचा राजाची वर्षानुवर्षे दंतकथा केवळ टिकली नाही तर त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. लालबागचा राजाला नवसाचा गणपती देखील म्हटले जाते.
खर तर लोकमान्य टिळकांनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आधी जनजागृती केली पाहिजे हे जाणले होते.याकरीता सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली होती. त्यापासून प्रेरणा घेत या मंडळाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात हातभार लावण्याचे ठरविले. मंडळाच्या शिल्लक निधीतून कस्तूरबा फंड, इ.स. १९४८ साली महात्मा गांधी मेमोरियल फंड, इ.स. १९५९ साली बिहार पूरग्रस्त निधीस आर्थिक मदत देऊन राष्ट्रीय कार्यात खारीचा वाटा उचलला. तसेच गणपतीच्या विविध देखाव्यात देखील बदल करून समाजापुढे राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारे देखावे मंडळाकडून सादर होऊ लागले.
नवसाला पावणारा अशी ख्याती असणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक गर्दी करत असतात. यामध्ये देशातील राजकीय व्यक्ति, खेळाडू तसेच बॉलीवुड सेलेब्रिटी तसेच अनेक टीव्हीवरील कलाकार यांचा समावेश असतो.आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि त्यांचे सर्व कुटुंबदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला येऊन पोचतात. सध्या आता या गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकारिणी मंडळात अनंत अंबानी यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . महिन्याभरापूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला अशी माहिती मिळत आहे. अंबानी कुटुंबाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातली योगदानाची दखल घेऊन लालबाग राजा मंडळाने हा निर्णय घेतला ही माहितीही समोर आली आहे.
यंदाचं लालबागच्या राजाचे हे 91वे वर्ष आहे.यंदा लालबाग राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आहे. तसेच लालबागच्या राजाचा मुकूट सोनेरी असून देशातील गर्भश्रीमंत अंबानी कुटुंबीयांकडून हा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. दरवर्षी लालबागचा राजा मंडळाकडून गणेशोत्सवाच्या निमित्ताने एक खास थीम निवडून त्यावर आधारित सजावट आणि मूळ प्रतिमा तयार केली जाते. यामध्ये विशिष्ट सामाजिक संदेश, ऐतिहासिक घटना, किंवा सांस्कृतिक संदर्भ यांचा समावेश असतो.पुतळाबाई चाळीमध्ये असलेला लालबागचा राजा किंवा ‘किंग ऑफ लालबाग’ हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिले जाणारे गणेश मंडळ आहे.
लालबागचा गणपती अनेक आपल्या अनेक वैशिष्ठयांमुळे ओळखला जातो.जसे की १९३५ मध्ये लालबागच्या राजाची प्रतिमा केवळ ५ फूट उंच होती. आज मात्र या लालबागच्या राजाची मूर्तीची उंची १४ फूट आहे.
दरवर्षी लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बँड, लेझिम व ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केट येथून निघते. डोळ्याचे पारणे फेडणारी भव्य अशी ही मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, लालबाग, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक तसेच क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग ,सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही.पी.रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गाने गिरगाव चौपाटी येथे पोहोचते. यावेळी समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी असतात. चौपाटीपासून काही अंतरावर आत अरबी समुद्रात हायड्राॅलिक्सचा वापर करत लालबागच्या राजाच्या भव्य मूर्तीचे विसर्जन केले जाते, गेल्या वर्षी ही लालबागच्या राजाची मिरवणूक तब्बल २३ तास चालली होती.