Ganesh Chaturthi 2024 : गणपती बापाच्या आगमनाच्या पहिल्याच दिवसापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जमली. यंदाही जरवर्षी प्रमाणे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण झालं.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर ओंकार जप, गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. हजारो महिलांनी एकाच वेळी अथर्वशीर्ष पठण केलं.
#WATCH | #GaneshChaturthi2024 | Devotees throng in large numbers to attend the procession of lord Ganesh at Shreemant Dagdusheth Halwai Ganesh Mandal, in Maharashtra's Pune pic.twitter.com/w6vVS0FYIQ
— ANI (@ANI) September 7, 2024
यावेळी महिला अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड ने घेत डॉ. दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले. यावर्षी महिलांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळालं.
दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नाना वाडयापर्यंतच्या परिसरात महिलांनी अथर्वशीर्ष पठणाकरीता गर्दी केली. भक्तीरसात तल्लीन झालेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली. पुण्यासह मुंबई, लातूर, कोल्हापूर, नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमात सहभाग घेतला.
माहितीसाठी दरवर्षी गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर ऋषिपंचमीला बाप्पा समोर हजारो महिला पहाटे सामूहिक अथर्वशीर्ष पठण करत असतात. ती पंरपरा यंदाही कायम राहिली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला जमल्या होत्या. या संदर्भातील काही व्हिडिओ समोर आले आहेत.