Pune News : पुणे शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे पुणेकर त्रस्त आहेत. गणपती उत्सवामध्ये बाहेरून येणाऱ्या गणपती भक्तांना देखील या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे.
तसेच कोथरुड परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. महापालिका प्रशासन हे खड्डे बुजवण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे शहर तसेच उपनगरांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. यादरम्यान, गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी खड्डे बुजविण्यात येतील, अशी ग्वाही महापालिकेने दिली होती. मात्र, महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले तरी अपुऱ्या मनुष्यबळामुळे या कामात अडथळे येत आहेत. अशा स्थितीत चंद्रकांत पाटलांनी खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली असून, त्याप्रमाणे काम देखील सुरु केले आहे.
या मोहिमे अंतर्गत आतापर्यंत कोथरुड मतदारसंघातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडीमधील मुख्य रस्त्यांवरील ४० खड्डे, कोथरूडमधील ३०० खड्डे बुजवले आहेत. यामुळे आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोथरुडकरांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराबद्दल कोथरुडकरांकडून समाधान व्यक्त होत आहे.