Maharashtra Weather : क्षणभर विश्रांतीनंतर राज्यात सध्या पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात पावसाला सुरुवात झाली असून, हवामान विभागाने सोमवारी संपूर्ण मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. सोमवारी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यात ठिकठिकाणी सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अशा परिस्थितीत हवामान विभागाने संपूर्ण मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.
उद्या छत्रपती संभाजीनगर,जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागात दिवसभर हवामान ढगाळ असून संध्याकाळी वादळी वाऱ्यांची ही शक्यता आहे.
हवामान खात्याकडून कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग य तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण विदर्भात आज पावसाचा यलो अलरक्ट जारी करण्यात आला आहे.
पुण्यातही पावसाची हजेरी
पुण्यासह साताऱ्यात सोमवारी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्याला जात आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भात देखील मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे पुणे व सातारा घाटमाथ्याचा भाग आणि संपूर्ण विदर्भात पुन्हा पाऊस वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.