Eknath Shinde : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दर्शन घेतले. शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत शेतकरी सुखी आणि आनंदी व्हावा असे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी घातले. अभिष्टचिंतन आणि वारकरी संतपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री काल आळंदीमध्ये होते.
आषाढी वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. आळंदीमधून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले, काल सकाळपासून अलंकापुरीमध्ये वैष्णवांचा मेळा जमला होता. टाळ व मृदुंगाच्या गजरामध्ये अवघे आळंदी शहर दुमदुमले होते. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी भजन व किर्तनामध्ये देखील सहभाग घेतला. गळ्यात केसरी उपरणे घेत व पगडी घालून मुख्यमंत्री शिंदे यांनी पालखी सोहळ्यामध्ये उपस्थितची लावली. मंदिर संस्थान व वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री शिंदे अगदी साधेपणाने जमिनीवर बसलेले दिसून आले. त्यांचे हेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आळंदीत काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “मी संत ज्ञानेश्वर महाराजांना वंदन करतो. आज मला पांडुरंगाच्या कृपेने पालखी सोहळा पाहता आला त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. मी पाडुंरंगाला व ज्ञानेश्वर महाराजांकडे एकच मागणं घालतो, त्यांच्यावरची सर्व संकट व अनिष्ट दूर होऊ दे. महाराष्ट्राच्या जनतेला सुखी व आनंदाचे दिवस येऊ दे….त्यांच्या चरणी हीच विनंती आहे. तसेच इंद्रायणी नदीला प्रदुषण मुक्त करणार असून हे वचन मी दिलं आहे. त्याचे काम देखील सुरु झाले आहे.” असे म्हंटले आहे.